वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील १८७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ कित्तूर आणि बैलहोंगल भाजपच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढून राज्य सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. या घोटाळ्यात आरोपी असलेले मंत्री बी. नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राणी चेन्नम्मा चौकातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यांवरून जात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात फलक घेतलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार महांतेश दस्तगौडर म्हणाले, “राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून भ्रष्टाचारात लिप्त आहे. एवढा मोठा घोटाळा उघडकीस येऊनही मुख्यमंत्री बी. नागेंद्र यांचा बचाव करत आहेत.” तर, काँग्रेस सरकारने नैतिकता पूर्णपणे धाब्यावर बसवली असून भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असा टोला महिला नेत्यांनी लगावला.
या आंदोलन प्रसंगी कित्तूर आणि बैलहोंगल परिसरातील भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments