बेळगाव महापालिकेत भाषिक वाद निर्माण करणारा कन्नड ठराव मंजूर करण्यासाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून प्रशासनावर दबाव आणण्यासाठी उग्र आंदोलनाची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकारच्या आदेशाचा आडोसा घेत शनिवारी जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे.

महापालिकेत कर्नाटक धोरणाशी संबंधित ठराव संमत करण्यासाठी राज्य सरकारकडून आलेल्या पत्राचा आधार घेत, कन्नड संघटनांच्या नेत्यांनी सर्किट हाऊस येथे तातडीची बैठक घडवून आणली. ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, कोणत्याही तांत्रिक बाबींचा विचार न करता महापौरांनी तातडीने विशेष बैठक बोलावून ठराव मंजूर करावा, असा अट्टाहास धरण्यात आला. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या महापालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करत महापौरांवर थेट दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
शासकीय आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी महापालिकेत जाऊन महापौरांची भेट घेण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. या दबावाच्या राजकारणात वीरशैव समाजाचे नेते आर. पी. पाटील यांच्यासह इतर काही घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय श्री नागपूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन आपल्या मागण्या लादण्याचे ठरविले आहे.
या बैठकीत महादेव तळवार, बलराम मासेनाट्टी, राजू कोला, सय्यद मन्सूर, सागर बोरगल्ल, वंदना होरकेरी, अनु एस. आर., शिवाजीराव गोरवर, सागर पूजेरी, संतोष तळमनी, राहुल भोसले, लक्ष्मीकांत माने, अशोक कोनकेरी, शुभम माने आणि मंजुनाथ पास्ते आदी कन्नड कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments