Bailahongala

ओव्हरलोड वाहनांमुळे चिकबागेवाडीतील नवीन रस्त्याची दुरवस्था

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिकबागेवाडी येथे नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता ओव्हरलोड वाहनांमुळे खराब होत असल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. नियमबाह्य अवजड वाहतुकीवर प्रशासनाने तत्काळ बंदी घालावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.

बैलहोंगल तालुक्यातील चिकबागेवाडी गावातून राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्याची काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो ओव्हरलोड गाड्यांमुळे नवीन रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागले आहेत.

रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच धूळ आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आणावी अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या समस्येची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेवर भेट कधी देणार आणि काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: