धारवाड तालुक्यातील शिवळ्ळी येथे उभारण्यात येत असलेल्या बायोगॅस प्रकल्पाला विरोध करत चार गावांतील ग्रामस्थांनी पदयात्रा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.

शिवळ्ळी, हेब्बळी, सोमापूर, सुळ्ळ आणि मारडगी गावांतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शिवळ्ळी येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या ६७ एकर जमिनीवर बीपीसीएलकडून सीएसआर अंतर्गत कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासोबत प्राणी नसबंदी उपचार केंद्र आणि कचरा विल्हेवाट प्रकल्पही प्रस्तावित आहेत.

या प्रकल्पांमुळे ग्रामस्थांना लाभापेक्षा अडचणी अधिक निर्माण होतील, असा दावा आंदोलकांनी केला. बायोगॅस प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाचा मानवी आरोग्याबरोबरच शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रकल्प शिवळ्ळी येथे उभारू नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शिवळ्ळीपासून धारवाडपर्यंत पदयात्रा काढली.
पदयात्रेनंतर ग्रामस्थांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रकल्पाचे काम सुरू ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments