Belagavi

बापट गल्लीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

Share

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील बापट गल्ली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले. यावेळी नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या तनिष जावळे याचा सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून मंदिरात काकड आरती, भजन, अभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. जितेंद्र रजपूत, लक्ष्मण साळुंखे आणि बंडू केरवाडकर यांच्या हस्ते महाआरती झाली. तसेच श्रुती इंगळे, माधुरी किल्लेकर, सदाशिव हिरेमठ, रेवती टोमरे आणि प्रमोद माळी यांनी उपवासाच्या प्रसाद व्यवस्थेत सहकार्य केले. या कार्यक्रमाला बापट गल्ली परिसरातील भाविक, पंचमंडळ आणि महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

यावेळी बापट गल्लीतील तनिष संदीप जावळे याने नीट परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून शासकीय कोट्यातून एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल त्याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी महेश पावले यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी सेवा संघाचे पांडुरंग पाटील, प्रभाकर कनबरगी, महादेव चौगुले, उदय पाटील, शिवराम गावणे, राजू पवार, महेश बाळकुंद्री, रोहन मिसाळ, राम जाधव, सिदरे बंधू तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: