जागतिक स्पर्धेच्या युगात उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची प्रभावी सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नितीन लांडगे यांनी केले. भारताच्या उत्पादन क्षेत्रासमोर स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


बेळगाव येथील रॉयल रिट्झ हॉटेलमध्ये आयइइइ उत्तर कर्नाटक सब-सेक्शन, आयईईई बेंगळुरू सेक्शन आणि बीडीएसएसआयए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंडस्ट्री समिट २०२६’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय, डिजिटायझेशन, आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंचलित प्रणाली आणि दर्जेदार उत्पादन यांवर भर देत जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेसाठी उद्योगांनी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे नितीन लांडगे यांनी सांगितले.


भारतीय कंपन्यांनी केवळ शेजारी देशांशी नव्हे, तर गुणवत्तेत जर्मनी आणि अचूकतेत जपानशी स्पर्धा करण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन नितीन लांडगे यांनी केले. ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून भारताने उत्पादन क्षेत्रात जागतिक आघाडी गाठावी, असेही ते म्हणाले.

भारतातील उत्पादन क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून उद्योगांसाठी ही मोठी संधी असल्याचे नितीन लांडगे यांनी सांगितले. पूर्वी महिन्याला ५०० ते १,००० युनिट्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आता १० हजारांहून अधिक युनिट्सचे उत्पादन करत आहेत. चीन, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्ससारख्या देशांकडून स्पर्धा असली तरी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता वाढवून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारतीय उद्योगांनी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात समन्वयक म्हणून अनिंद्य साहा, तर पॅनेलिस्ट म्हणून रमेश दरला, डॉ. विजय अठावले, रोहन जवळी आणि मल्लिकार्जुन कंबळीहाळ उपस्थित होते. तसेच रुद्रस्वामी, महेश वस्त्रद, आलोकनाथ डे, अनंतनाग बी. के. आणि राहुल सूर्यवंशी यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदविला.


Recent Comments