Dharwad

खासगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Share

धारवाड येथील एका खासगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चौथीतील विद्यार्थ्याचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

नवलगुंद शहरातील अण्णिगेरी रस्त्यावरील विद्या ज्योती प्राथमिक शाळेत आकाश नीलन्नवर हा बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते, मात्र वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. मूळचा नवलगुंद येथील शानावाड गावचा असलेला आकाश याला केवळ आठ दिवसांपूर्वीच चांगल्या शिक्षणासाठी या खासगी शाळेत दाखल करण्यात आले होते.

या घटनेनंतर आकाशच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर छळाचा आरोप केला आहे. आकाश अभ्यासात चांगला असतानाही शाळेतील कर्मचाऱ्यांकडून त्याला वारंवार मारहाण केली जात होती. रुग्णालयात नेत असताना डोक्याला दुखापत झाल्याचे सांगत डोक्यावर मारल्याचे आकाशने आपल्याला सांगितल्याचा उल्लेख त्याच्या वडिलांनी केला. तर शाळा व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळेच आम्ही आमचा मुलगा गमावला, अशी प्रतिक्रिया आकाशच्या आईने दिली.

घटनेची माहिती मिळताच नवलगुंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सध्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणावर बोलताना धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी सांगितले की, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीनंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Tags: