कर्नाटकचे गृहमंत्री प्रियंक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पाठवलेल्या पत्राच्या निषेधार्थ धारवाड येथे श्रीराम सेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी प्रियंक खर्गे आणि काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

“प्रियंक खर्गे हे केवळ एका राज्याचे गृहमंत्री आहेत, संपूर्ण देशाचे नव्हे,” असा टोला लगावत मुतालिक यांनी खर्गे स्वतःला देशाचे गृहमंत्री असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केला. रएसएस ही केवळ कर्नाटकपुरती मर्यादित नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संघटना आहे. या संघटनेच्या नोंदणीबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. खर्गे यांना कायद्याची आणि संविधानातील माहिती नसून ते अज्ञानातून वक्तव्ये करत आहेत. तसेच, १९७५ मध्ये देशातील संविधानाची पायमल्ली करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना संविधानावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

याच वेळी त्यांनी धर्मस्थळ प्रकरणाचा उल्लेख करत, या प्रकरणात नाव समोर आलेले चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांना एसआयटीने तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. प्रकाश राज हे नास्तिक आणि हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या छायाचित्राची विटंबना करून तीव्र निषेध नोंदवला.


Recent Comments