कागवाड तालुका पंचायतीच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ६१.२९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा परिषदेचे विकास प्रशासकीय अधिकारी बसवराज अडविमठ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

कागवाड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रमुखांसोबत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. ६१.२९ कोटी रुपयांच्या या आराखड्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५६.०५ कोटी आणि इतर खर्चासाठी १.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि जमाती उपयोजनेंतर्गत विविध कामांसाठी ३.८१ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

कागवाड तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी वीरन्ना वाली यांनी या वार्षिक बजेटची सविस्तर माहिती बैठकीत मांडली.
या बैठकीत शिक्षण अधिकारी पी. बी. मदभावी, पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र मुरुगाली, वनविभागाचे रमेश अर्जुनवाड, मल्लप्पा तेली, पी. एस. पत्तार, कृषी विभागाचे लिंगण्णा बिरादार, फलोत्पादन विभागाच्या गौतमी शिरगांवी, व्यंकटेश कुलकर्णी यांच्यासह मंगसुळी, शिरगुप्पी, जुगूळ, उगाळ, कुसनाळ, मोळे, कृष्णा कित्तूर आणि केंपवाड ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी उपस्थित होते. तालुका पंचायतीचे सहाय्यक अधिकारी ए. डी. अन्सारी यांनी सर्वांचे स्वागत केले.
बैठकीत पिण्याचे पाणी, कृषी विभागामार्फत होणारे बियाणे आणि खत वाटप याबाबींचा विशेष आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे उपसचिव बसवराज अडविमठ यांनी सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना दिल्या.


Recent Comments