कागवाड तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. मंगसुळी गावात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.


मंगसुळी येथील सरकारी प्राथमिक व हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी कागवाड तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन्ना वाली यांनी सरकारी शाळांमधील गुणवत्ता आणि मूलभूत सुविधांवर भर देत पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच प्रवेश द्यावा, असे आवाहन केले.

क्षेत्र शिक्षणाधिकारी पांडुरंग मदभावी यांनी शाळेच्या उत्तम निकालाचे कौतुक करत कन्नडसोबतच इंग्रजी, संगणक आणि एलकेजी, यूकेजी वर्गांची सोय उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, गावात पाणीटंचाई असतानाही स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शाळेत ५०० हून अधिक झाडे जगवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्नाटकच्या सरकारी शाळांमधील दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे माझी नातवंडेही येथेच शिकत आहेत, अशा शब्दांत सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक संभाजी मेंढे यांनी कौतुक केले.
शाळेच्या विकासासाठी विविध संस्था, देणगीदार आणि व्यापाऱ्यांनी रोख रक्कमेसह संगणक व प्रोजेक्टर्सची मदत केली आहे, असे शिक्षक रामचंद्र पाटील यांनी सांगून आभार मानले.
या कार्यक्रमाला हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कदम यांच्यासह प्राथमिक शाळेचे शिक्षक, एसडीएमसी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments