कागवाडमधील उगार आणि कल्लाळ गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या ओढ्यावर ७५ लाख रुपये खर्चाच्या चेक डॅमच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राजू कागे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून, यामुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.

उगार-कल्लाळ गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या ओढ्यावर चेक डॅम बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. लघु पाटबंधारे विभागाच्या भूजल विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या कामाचे मंगळवारी भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

हल्याळ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वागमोडे आणि कुसनाळ पार्श्वनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मलगौडा पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार राजू कागे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन या कामासाठी विशेष प्रयत्न केले होते.

आमदार राजू कागे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण आहे, तसेच या चेक डॅममुळे जवळपास एक हजारांहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होऊन परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असे बाहुबली निडगुंदी आणि शंकर वागमोडे यांनी म्हटले.
लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सचिन माळी यांनी या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली, तर शासकीय नियमांनुसार विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदार बी. के. मगदूम यांनी दिले. या प्रसंगी परिसरातील शेतकरी नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments