कागवाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रेशन दुकानांवरील सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना धान्य मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मे महिना संपत आला तरी तांत्रिक बिघाड कायम असल्याने कडक उन्हात रेशन दुकानांसमोर तासन्तास उभे राहूनही नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

तालुक्यातील कागवाड, शेडबाळ, उगार, ऐनापूर, कुसनाळ, शिरगुप्पी, जुगूळ यांसह विविध गावांतील रेशन कार्डधारक धान्य आणण्यासाठी गेले असता, त्यांचे बायोमेट्रिक मशीनवर दोनवेळा अंगठ्याचे ठसे घेतले जात आहेत. मात्र, ग्राहकांना मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे रेशन एकत्र दिले जात असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने संभ्रम निर्माण झाला असून रेशन दुकानदारही नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती देत आहेत.

या संदर्भात कागवाड तालुक्याचे अन्न निरीक्षक संतोषकुमार बुरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या रेशन दुकानात दिले जाणारे धान्य हे मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित आहे. हे केंद्र सरकारचे एनएफएसए रेशन असून कागवाड तालुक्यात ३१,२०० बीपीएल आणि १९,०३५ अंत्योदय कार्डधारक आहेत. या सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे रेशन धान्य एकत्र दिले जात आहे, असे अन्न निरीक्षक संतोषकुमार बुरुडे यांनी म्हटले.
तालुक्यातील सुमारे २० हजार कार्डधारकांनी आतापर्यंत धान्य घेतले आहे. सर्व्हरची समस्या निर्माण झाली ही वस्तुस्थिती असली, तरी येत्या काही दिवसांत ही तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर होईल. वरिष्ठ अधिकारी सर्व्हर सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अन्न निरीक्षक संतोषकुमार बुरुडे यांनी दिली.


Recent Comments