धारवाडमध्ये स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच असून, आज आंदोलकांनी जुबली चौकात मानवी साखळी निर्माण करत रास्ता रोको केला. या वेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि आमदार अरविंद बेल्लद यांच्या प्रतिमांचे दहन करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.


हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या धारवाड कार्यालयासमोरून आंदोलकांनी भव्य निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा जुबली चौकात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि विधानसभेतील विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद यांच्या प्रतिमांचे दहन करून संताप व्यक्त केला.


या वेळी चौकात मानवी साखळी निर्माण करून स्वतंत्र महानगरपालिकेला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धारवाडचा अपेक्षेनुसार विकास होत नसून, विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र पालिकेची अत्यंत गरज आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
गेल्या अनेक दशकांपासून ही मागणी प्रलंबित असून, आता कुठे राज्य सरकारने या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वतंत्र पालिकेसाठी पावले उचलली आहेत. मात्र, स्वतंत्र पालिका स्थापनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे गेला असताना, राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करण्यास विलंब करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
ही भूमिका योग्य नसून राज्यपालांनी या प्रस्तावावर तातडीने स्वाक्षरी करावी, अशी मागणी करण्यात आली. विरोध करणाऱ्या नेत्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला.


Recent Comments