Chikkodi

कृष्णा नदीचे पात्र कोरडे; नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे सावट

Share

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर, कल्लोळ, मांजरी, इंगळी तसेच रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती, दिग्गेवाडी, भिरडी आणि चिंचली या गावांच्या हद्दीतून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये सध्या अत्यंत कमी पाणी शिल्लक आहे. उन्हाचा कडाका असाच सुरू राहिल्यास नदी पूर्णपणे आटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी नदीच्या पात्रातच मोठे खड्डे खणावे लागत असल्याने चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिके घेतली आहेत, मात्र पाण्याअभावी ही पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या भागातील अनेक गावे पूर्णपणे कृष्णा नदीवर अवलंबून असून, दरवर्षी उन्हाळ्यात स्थानिक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

कृष्णा नदीतील पाणी आटल्यामुळे या भागातील दोन मोठ्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प होण्याची शक्यता आहे. यामध्ये कंचकरवाडी, दिग्गेवाडी, बिरडी, जलालपूर, यड्रॉव या गावांची एक योजना आणि बेंडवाड, मेखळी, हुब्बरवाडी, मंटूर अशा ११ गावांचा समावेश असलेली दुसरी योजना बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

सौंदत्ती जवळील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधील पाण्याची पातळी खालावली असून, परिसरातील कूपनलिकांचे जलस्तरही घटले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी नदी पूर्णपणे आटण्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: