कागवाड तालुक्यातील कुसनाळ ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.


कुसनाळ ग्रामपंचायत हद्दीतील शेतजमिनीवर सध्या पाण्याचा निचरा करणाऱ्या कालव्याचे काम सुरू आहे. या कामावर गेल्या सात दिवसांपासून ६८ मजूर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत काम करत आहेत. यामध्ये महिला मजुरांचाही समावेश असून प्रत्येकाला प्रतिदिन ३७० रुपये प्रमाणे मजुरी दिली जात आहे. कागवाड तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी ईरण्णा वाली आणि सहाय्यक अधिकारी शिवानंद सनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विकास अधिकारी राकेश कांबळे, सचिव व्यंकटेश कुलकर्णी व कर्मचाऱ्यांनी या कामाची माहिती दिली.


या कामावर कार्यरत असलेल्या इंदिरा कांबळे आणि रमेश बिरडी या मजुरांनी सांगितले की, “उन्हाळ्यात हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती, अशा वेळी ग्रामपंचायतीने रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी, मोफत वीज, मोफत बस प्रवास आणि अन्नभाग्य या योजनांमुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.” राजकीय स्तरावर काहीही टीका-टिपणी होत असली, तरी या योजनांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना थेट मदत होत असल्याचे मजुरांनी स्पष्ट केले.


Recent Comments