Kagawad

कागवाडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; सरकारी शाळेचे छप्पर कोसळले

Share

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड शहरात अवेळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे सरकारी शाळेचे छप्पर उडून गेले असून सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली आहे.

कागवाड शहर आणि परिसरात बुधवारी संध्याकाळी अवेळी पावसासह सुटलेल्या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले. येथील सरकारी कन्नड शाळेच्या इमारतीवरील पत्रे पूर्णपणे उडून खाली पडले आहेत. सुदैवाने, उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळेत विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

वादळाचा फटका केवळ शाळेलाच नाही, तर पशुवैद्यकीय विभागाच्या रुग्णवाहिकेलाही बसला आहे. सरकारी उर्दू शाळेच्या आवारातील पिण्याच्या पाण्याची टाकी रुग्णवाहिकेवर पडल्याने वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच दुरुस्ती केलेल्या कन्नड शाळेच्या इमारतीचे पत्रे पुन्हा उडाल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, अधिकारी लवकरच घटनास्थळाची पाहणी करतील, असे शिक्षण अधिकारी पांडुरंग मदभावी यांनी म्हटले.

अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हानी झालेल्या इमारतींची दुरुस्ती लवकर करण्याचे आश्वासन पांडुरंग मदभावी यांनी दिले आहे.

Tags: