केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन’ या केवळ नावापुरत्या कायद्याचा घाट न घालता २०२३ चे महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करावे, अशी मागणी चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली आहे.


चिक्कोडी येथील नगरमुन्नोळी ब्लॉक काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की, “राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले होते. काँग्रेस महिला विरोधी आहे या भाजपच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.”

“लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणाचे विधेयक घाईघाईत मांडून भाजपने संशय निर्माण केला आहे. मणिपूर, उत्तर प्रदेश यांसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही भाजप गप्प आहे. यावरून भाजपचा महिलांविषयीचा पुळका बेगडी असल्याचे स्पष्ट होते,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, “महिला आरक्षण विधेयकासोबतच मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा भाजप सरकारचा डाव संशयास्पद होता, म्हणूनच संसदेत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी त्याला विरोध केला होता. काँग्रेस नेहमीच महिलांच्या बाजूने उभी राहिली आहे.”
या पत्रकार परिषदेला चिक्कोडी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मला पाटील, गणेश मोहिते, नेते प्रभाकर कोरे, तनुजा शिंगे, लक्ष्मी पाटील, रेखा दादुगोळ, राजू कोटगी आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments