धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आदित्य मॅगेरी या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप करत एबीव्हीपीने तीव्र निदर्शने केली. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी धारवाडमध्ये संताप व्यक्त केला.

एबीव्हीपीच्या नेतृत्वाखाली धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. किटेल कॉलेजचा बी.एस्सीचा विद्यार्थी आदित्य मॅगेरी (२०) याच्या आत्महत्येला विद्यागिरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा निषेध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी अंमली पदार्थ आणि गांजा चाचणीसाठी पोलिसांनी आदित्यला ताब्यात घेतले होते. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असतानाही, पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थांमार्फत दोन हजार रुपयांची सतत मागणी केली. पोलिसांकडून होणाऱ्या या सततच्या मानसिक छळामुळे त्रस्त होऊन आदित्यने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
आदित्यच्या आत्महत्येला पूर्णपणे पोलिसांचा छळ कारणीभूत आहे. निगेटिव्ह रिपोर्ट येऊनही केवळ पैशांसाठी एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी घेण्यात आला असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दर्शन हेगडे यांनी व्यक्त केली.


Recent Comments