Kagawad

‘इन न्यूज’ इफेक्ट : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

Share

कागवाड तालुक्यातील लोकूर परिसरात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त इन न्यूज वर प्रसारित करण्यात आले होते ‘इन न्यूज’च्या सदर बातमीची दखल घेत कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत.

मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे द्राक्ष, पेरू, शेवगा आणि ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात गारांचे ढीग साचले होते, जे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विरघळले नव्हते. निसर्गाच्या या प्रकोपामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अशा प्रकारची गारपीट पहिल्यांदाच पाहिल्याची प्रतिक्रिया राजाराम गडगे यांनी व्यक्त केली.

कागवाडचे कृषी अधिकारी कांतीनाथ बिरादार, फलोत्पादन अधिकारी अरुण कुमार हिडकल आणि ग्राम प्रशासकीय अधिकारी सुमित्रा खिलारी यांनी बाधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे २०० एकर क्षेत्रातील उसाच्या पानांचे नुकसान झाले असून, पिकाला सावरण्यासाठी आवश्यक खते आणि औषध फवारणीबाबत कांतीनाथ बिरादार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

फलोत्पादन विभागाच्या माहितीनुसार, २५ एकर द्राक्ष, ६ एकर पेरू आणि भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सविस्तर अहवाल तहसीलदार आणि जिल्हा कृषी विभागाकडे सोपवण्यात आला आहे. ‘इन न्यूज’च्या बातमीमुळे प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: