कागवाड क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रात दहावी (SSLC) परीक्षेचा निकाल ९५.४२ टक्के लागला असून, चिकौडी जिल्हा स्तरावर तालुक्याने द्वितीय स्थान पटकावले आहे, अशी माहिती बीईओ पांडुरंग मदभावी यांनी दिली.


कागवाड येथील क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयात तालुक्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले.
तालुक्यातील एकूण ३७ माध्यमिक शाळांपैकी १७ शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. परीक्षेला बसलेल्या २१६१ विद्यार्थ्यांपैकी २०६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ ९९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकालाची टक्केवारी ९५.४५ इतकी आहे.
तालुक्यातील अन्य ६ शाळांचा निकाल ९९ टक्के लागला आहे. यंदाचा निकाल विशेष असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे पांडुरंग मदभावी यांनी म्हटले.
या सत्कार समारंभात शेडबाळ येथील सन्मती विद्यालयाचा विद्यार्थी संतोष रत्नापूगोळ (राज्यात तृतीय), तांगडी येथील सरकारी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी यशोदा मूरे, आयनापूर येथील केआरईएस शाळेची ऐश्वर्या उंग्राणी आणि सुरगुप्पी येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक एम. वाय. पुजारी, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ए. एस. पाटील, मुख्याध्यापिका एम. एन. काळीनट्टी, एस. पी. सनदी, एस. आर. हुलिनवर, आर. टी. गुरव, एस. आर. माळी, भरत गेलवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments