कागवाड तालुक्यातील उगार बी.के. गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे कौतुक करत विकासकामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.


कागवाड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींनी १०० टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले असून या कामगिरीमुळे तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ‘कायक ग्राम’ योजनेतंर्गत मागास गावांमध्ये सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन राहुल शिंदे यांनी यावेळी दिले. विशेषतः पाणीपुरवठा, ग्रंथालय आणि अंगणवाड्यांच्या कामकाजाची पाहणी करून हा जमा झालेला निधी गावाच्या मूलभूत सुविधांसाठी वापरण्याच्या सूचना राहुल शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.


उगारमधील आमदार मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने, मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रिकरण करून एकाच छताखाली शिक्षणाची सोय करण्याबाबत पावले उचलली जातील, असे राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गणिताचे प्रश्न अचूक सोडवणाऱ्या मुलांचे त्यांनी कौतुक केले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी बालसंगोपन केंद्र आणि संजिवनी महिला बचत गटाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी १०० टक्के कर वसुली करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा आणि तालुका पातळीवरील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments