Kagawad

शेडबाळ येथील जैन शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

Share

शेडबाळ येथील आचार्य शांतीसागर जैन आश्रमात प्राथमिक, माध्यमिक आणि निवासी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारक्षम शिक्षणाची गरज अधोरेखित केली.

गुर्लापूर क्रॉस येथील ऊस दर आंदोलनाला हळींगळी जैन मठाचे परमपूज्य कुलबुषण मुनी महाराजांच्या आशीर्वादाचे मोठे पाठबळ लाभले असून, त्यांच्याच प्रेरणेने हा शेतकरी लढा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे गौरव अध्यक्ष शशिकांत गुरुजी यांनी केले. शेडबाळ येथील वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना गुरुजी म्हणाले की, मुनींनी आंदोलनासाठी आर्थिक मदत करण्यासोबतच तीन दिवस उपोषण करून लढ्याला बळ दिले होते. शांतीसागर महाराजांच्या या आश्रमातील विद्यार्थी देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तव्यनिष्ठेचा दाखला दिला. पत्नीच्या निधनाचे वृत्त समजूनही आंदोलकांचे प्राण वाचवण्यासाठी कोर्टातील युक्तिवाद सुरूच ठेवणाऱ्या आंबेडकरांचा आदर्श पालकांनी मुलांसमोर ठेवावा, असे आवाहन शशिकांत गुरुजी यांनी केले.

व्यासपीठावर सन्मती शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद बरगाले, शेडबाळ पट्टण पंचायतीचे अध्यक्ष उत्कर्ष पाटील, किरण यंदगौडर, शुभम पाटील, जिन्नप्पा नांदनी, सुदर्शन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक चेतन नांद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

Tags: