Bagalkot

जमखंडीत सब-रजिस्ट्रार कार्यालयात प्रेमीयुगुलांवर हल्ला

Share

जमखंडीच्या सब-रजिस्ट्रार कार्यालयात विवाह नोंदणीसाठी आलेल्या आंतरजातीय प्रेमीयुगुलांवर त्यांच्या कुटुंबीयांनीच हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जमखंडीच्या सब-रजिस्ट्रार कार्यालयात मंगळवारी एक नाट्यमय प्रसंग घडला. उळ्ळागड्डी परिसरातील गाणिग समाजातील लक्ष्मी आणि मराठा समाजातील अप्पाजी हे दोघं प्रेमसंबंधात होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याने ते थेट सब-रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचले. मात्र त्यांचं हे नातं पालकांना मान्य नव्हतं. या गोष्टीची माहिती मिळताच, दोघांचे पालक सब-रजिस्ट्रार कार्यालयात दाखल झाले आणि संतप्त अवस्थेत त्यांनी मुलीला मारहाण केली. यादरम्यान सदर तरुणी जखमी होऊन तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला.

सदर घटनेदरम्यान तहसीलदार सदाशिव मुक्कोजी यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिच्या पालकांनी तिला खेचत नेले. रक्तबंबाळ अवस्थेतही ती आपल्या प्रियकराकडे हात करत होती. जखमी झालेल्या मुलीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, संबंधित युवकाला जमखंडी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: