धारवाड येथे श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण हलालमुक्त असावेत, असे वक्तव्य केले आहे. हलाल पद्धत ही इस्लामशी संबंधित असून हिंदू धर्माशी त्याचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात सध्या गुढीपाडव्याच्या सणाची तयारी सुरू असून, त्यानंतर रामनवमी उत्साहात साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी प्रतिक्रिया देत गुढीपाडवा व रामनवमी हे सण हलालमुक्त असावेत, असे मत मांडले.
धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुतालिक म्हणाले, हलाल ही इस्लामशी संबंधित प्रक्रिया आहे. हिंदूंना ती स्वीकारण्याची गरज नाही. इस्लाम धर्मीय आपला व्यवसाय हलाल प्रक्रियेद्वारे करतात. मात्र, हिंदूंवर ती लादली जाणे चुकीचे आहे. कुंकू, हळद, नारळ, मंगळसूत्र यांसारख्या धार्मिक वस्तू हलाल प्रक्रियेद्वारे विकल्या जात आहेत. त्यामुळे हिंदूंनी अशा व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता शुद्ध आणि पवित्र वस्तू विकत घ्याव्यात.
ते पुढे म्हणाले, गोहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हिंदूंनी काहीही खरेदी करू नये. अशा वस्तूंचा उपयोग देवपूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी करणे हे धार्मिक शास्त्रांनुसार अयोग्य आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण पवित्र राहावे यासाठी हलालमुक्त वातावरण असावे, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments