राज्यात 60 वर्षांपासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचा व्होट बँक म्हणून वापर करण्यात आलाय. त्यामुळेच एससी आणि एसटीचा शाप काँग्रेसला भोवतो आहे. आता व्होट बँकेचे राजकारण नको. 2023 मध्ये एसटी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेळ्ळारी येथे आयोजित एसटी नवशक्ती परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी काँगेसवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, देशात साठ वर्षे राज्य करून तुम्ही काय केले? एसटी समाजाचा विकास आम्हीच करून दाखवला असे दावे करत फिरणाऱ्या नेत्यांनी काय केले आहे? नुसती व्होट बँक निर्माण करून एससी, एसटी समाजावर अन्याय केल्याचा शापच तुम्हाला मिळेल. यापुढे तुमच्या व्होट बँकेच्या राजकारणाचे नाटक आणि विश्वासघात करू नका. जनता जागरूक झाली असून अहिंदच्या नेत्याच्या मागे जाणार नाही.
अहिंदचा मुखवटा घालून काय केले, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. एसटी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना देशाचे राष्ट्रपती करणे काँग्रेसला मान्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. 60 वर्षांपासून मागास समाजातील लोकांचे असेच शोषण होत आहे. ‘भारत जोडो’मध्ये एका छोट्या मैदानात बैठक घेतली आणि ती त्सुनामी असल्याचे काँग्रेसने सांगितले. इथे या आणि बघा, तुम्ही या सुनामीत वाहून जाल. सोनियांनी बेळ्ळारीमध्ये स्पर्धा केली तेव्हा त्यांनी दिलेल्या पॅकेजच्या आश्वासनाचे काय झाले? बेळ्ळारीतील जनतेने निवडून दिले तरी त्यांनी एकदाही धन्यवाद म्हटले नाही आणि विकासाचे तीन पैसेही केले नाहीत. बेळ्ळारीतील जनतेची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसविरोधात शंभर टक्के कमळ फुलवा, असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले.
एसटी मेळाव्याला संबोधित करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राजकारणात आरक्षण वाढविण्याला विशेष महत्व आहे. नरेंद्र मोदी देशात सत्तेवर आल्यानंतर ते दलितांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. भाजपने दलित महिलेला राष्ट्रपती केले आहे. काँग्रेसला दलितांची आठवण का आली नाही आणि त्यांना उच्च पद का दिले नाही. भाजपने मुंडा यांना दोनदा मुख्यमंत्री केले आहेत. दलितांना राजकारणात उच्च स्थान देण्याचे काम भाजपशिवाय कोणीही करू शकत नाही. मोदी सरकारने आदिवासी, दलित आणि हिंदूंसाठी उज्वला आणि गरीब कल्याणसह अनेक योजना दिल्या आहेत. बोम्मयी आणि श्रीरामुलू यांनी आरक्षण वाढवून मोठा बदल घडवून आणण्याचे काम केले आहे असे नड्डा यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भगवंत खुबा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी, परिवहन व अनुसूचित जमाती विभागाचे मंत्री बी. श्री रामुलू, मंत्री गोविंद कारजोळ, आनंद सिंह, प्रभू चौहान, आमदार सोमशेखर रेड्डी, करुणाकर रेड्डी, राजू गौडा आदी उपस्थित होते.


Recent Comments