बळ्ळारी परिक्षेत्राचे आयजीपी डॉ. हर्ष यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने गुन्हेगारांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये २२ विशेष पथकांनी एकाच वेळी ३८१ सराईत गुन्हेगारांच्या (रौडी शीटर) घरांवर छापे टाकून तपासणी केली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना आयजीपी डॉ. हर्ष यांनी सांगितले की, बळ्ळारी जिल्ह्यातील १०४, विजयनगरमधील १०६, कोप्पळमधील ६८ आणि रायचूरमधील १०३ गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या मोहिमेदरम्यान बळ्ळारीतील एका कुख्यात गुन्हेगाराच्या घरातून बेकायदेशीर एअर गन, कोरे स्टॅम्प पेपर आणि मालमत्तेची संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपास पथकाने ही सर्व कागदपत्रे पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतली आहेत.
तपासणी दरम्यान गुन्हेगारांचे सध्याचे वास्तव्य, त्यांच्या अवैध कारवाया आणि त्यांच्या साथीदारांच्या जाळ्याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. ज्या ठिकाणी गुन्हेगार आढळून आले नाहीत, त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५३ गुन्हेगारांना तडीपार करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी १० जणांना गृहविभागाने आधीच तडीपार केले असून, उर्वरित प्रकरणांवर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आयजीपी डॉ. हर्ष यांनी स्पष्ट केले.


Recent Comments