Belagavi

२३ ऑक्टोबरपासून तीन दिवस साजरा होणार भव्य कित्तूर उत्सव : पालकमंत्री

Share

राणी कित्तूर चन्नम्मा यांनी इंग्रजांविरोधात लढून मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे कित्तूर उत्सवाचे आयोजन केले जाई. यंदा दरवर्षीप्रमाणे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भव्य पद्धतीने कित्तूर उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कित्तूर उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार असून यासंदर्भात आज पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बेळगाव जिल्ह्यातील तालुका केंद्रांपर्यंत मर्यादित असलेली विरज्योती राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली असून बेंगळुरू येथे २ ऑक्टोबर रोजी १०.३० वाजता टाऊन हॉल येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्योतीचे स्वागत होणार आहे. यानंतर कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे पूजन होऊन २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हि ज्योती कित्तूर येथे पोहोचणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. कित्तूर येथे विरज्योती पोहोचल्यानंतर ध्वजारोहण पार पडेल. यानंतर विविध कला मंडळ आणि पथकांच्या सहभागाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून इतर राज्यातील ७५ हुन अधिक कलापथके या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

याचदिवशी कित्तूर चन्नम्मा यांचे जन्मस्थान असलेल्या काकती या गावात सकाळ ८.३० वाजता कित्तूर राणी चन्नम्मा मूर्तिपूजन राज्यातील मंत्री, खासदार, स्वामीजी, आणि आमदारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. १२ हजार आसन क्षमतेचे नियोजन केलेल्या या समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात केंद्रीय तसेच राज्यातील मंत्री सहभागी होणार असून तीन दिवस भव्य प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात विविध कला पथकांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

Tags:

govinda karjol kittur utsav