Belagavi

सांगा जगायचे कसे? वडगावच्या केशवनगरात घरांत पाणीचपाणी !

Share

बेळगावात वरुणराजाने खरोखरच थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रहिवाशी संकटात सापडले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

होय, बेळगावात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यातही गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे रहिवाशी संकटात सापडले आहेत. वडगावातील केशव नगर, अन्नपूर्णेश्वरी नगर आदी वसाहती पाण्याखाली गेल्या आहेत.

अन्नपूर्णेश्वरी नगरच्या सहाव्या क्रॉसवरील रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. केशव नगरमधील 10 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही लोक खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर स्थलांतरित झाले आहेत. मात्र एकच मजला असलेल्या घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागात पावसाच्या पाण्याची समस्या आहे.  महापालिकेने गटारांची व्यवस्था केली नसल्याने ही समस्या उदभवत असल्याचा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला.

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर भागात पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून घरांमध्ये शिरत आहे. या भागात ड्रेनेज आणि गटारींची व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर पाणी साचून घरांमध्ये शिरते. त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान होते. ही दरवर्षीचीच डोकेदुखी बनली आहे. २०१९ पासून ही समस्या मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात उदभवते. अन्नपूर्णेश्वरी नगरातुन येणारे पावसाचे पाणी केशवनगरमध्ये येऊन घरा-घरांमध्ये तुंबते. यावर्षी २१ घरांमध्ये पाणी तुंबले आहे. त्यामुळे आम्हाला राहणे कठीण झाले आहे. पाचव्या क्रॉस परिसरात परिस्थिती गंभीर आहे. उंचावरील घरांमध्येही पाणी घुसत आहे. महापालिकेने ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी रहिवाशांनी केली. या संदर्भात बोलताना प्रभाग क्र. ५०च्या नगरसेविका सारिका पाटील म्हणाल्या, केशवनगर परिसरात सर्वत्र पेव्हर्स बसविले आहेत. त्यामुळे यंदा फारशी अडचण नाही. यावेळी केवळ दहा घरांमध्ये पाणी शिरले. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सर्व घरे पाण्याखाली गेल्याने लोकांचे खूप हाल झाले. मी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी असून, पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. आ. अभय पाटील यांनी दिवाळीनंतर पाच कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यातून नाझर कॅम्प ते गणपती मंदिरापर्यंत गटार बांधण्यात येणार आहे. त्यानंतर ही समस्या मार्गी लागेल असे नगरसेविका सारिका पाटील यांनी सांगितले. एकंदरीत बेळगावात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या असून सखल भागातील नागरिकांची परिस्थितीही बिकट आहे. आता महापालिकेचे अधिकारी या समस्या सोडवून लोकांना कशी मदत करतात, हे पहावे लागेल.

Tags: