Belagavi

अनगोळ येथील फूटपाथवरील अतिक्रमण हटवल्याप्रकरणी व्यापाऱ्यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

Share

महापालिका केवळ रस्त्यावरील छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत, अनगोळ येथील एकतर्फी कारवाईविरोधात व्यापारी आणि नागरिकांनी आज पालिका आयुक्तांना निवेदन दिले. तसेच खाऊ कट्टा परिसरातील अतिक्रमण आधी हटवण्याची मागणी केली.

बेळगाव महानगरपालिका क्षेत्रातील अनगोळ येथे अलीकडेच रस्त्यावरील व्यापाऱ्यांवर झालेली अतिक्रमण विरोधी कारवाई सार्वजनिक चर्चेचा विषय बनली आहे. एससी-एसटी आणि मागासवर्गीय समाजातील छोट्या व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची दुकाने लक्ष्य करून ती हटवण्यात आल्याचा आरोप करत व्यापारी शिष्टमंडळाने या कारवाईचा निषेध केला आहे.

निवेदन देताना सुजीत मुळगुंद म्हणाले, “२०२२ पासून शहरात खाऊ कट्ट्याच्या परिसरात फूटपाथवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून, टेबल-खुर्च्या टाकून व्यवसाय केला जात आहे. प्रशासनाने आधी त्या परिसरातील अतिक्रमणे पूर्णपणे हटवून ‘फूटपाथ क्लिअरन्स’ करावा आणि त्यानंतरच इतर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली .

याप्रसंगी ॲडव्होकेट एन. आर. लातूर म्हणाले की, महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन आणि दररोज जमिनीचे भाडे भरून व्यवसाय करणाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी अनगोळ परिसरातील रस्त्यावरील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: