म्हैसूर येथे विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचारावरून विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार रणकंदन माजले. आरोप–प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी विधानसभेत, राज्यातील महिला अत्याचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधी काँग्रेस सदस्य सरकारवर चांगलेच तुटून पडले. विरोधी पक्षनेते सिद्रामय्यांनीही सरकारवर तोंडसुख घेतले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेस सरकारच्या काळात दरवर्षी महिलांवर किती अत्याचार झाले होते याची आकडेवारीच सादर केली. त्यामुळे काँग्रेसच्या महिला आमदारांनी आक्रमक होत सभाध्यक्षांपुढील हौद्यात धाव घेत निदर्शने केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार रणकंदन माजले.
त्यानंतर बोलताना सिद्रामय्या यांनी म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण सरकारने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यावर आक्रमक होत मुख्यमंत्री बोम्मई, आरोग्यमंत्री सुधाकर यांनी, हे प्रकरण का दडपावे? कोणतेही सरकार असले तरी असे प्रकरण दडपले जाते का? असे कधी घडले आहे का? अशा प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यावर सिद्रामय्या यांनी मला तसा संशय आला आहे. तसे नाहीतर एफआयआर नोंदवण्यासाठी १२ तास का लागले? असे विचारले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी हे प्रकरण दडपण्याचा आरोप आम्ही साफ फेटाळून लावतो, केवळ माहिती मिळताच आम्ही सर्व आरोपीना अटक केली. यावरूनच आम्ही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सिद्ध होते असे सांगत पलटवार केला.
त्यानंतर काँग्रेस आ. रूपा शशिधर म्हणाल्या, आज समाजात महिलांना असुरक्षित वाटत आहे. म्हैसूर अत्याचाराच्या घटनेबाबत आमच्या विधिमंडळ नेत्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. चित्रदूर्गमध्ये १३ वर्षांच्या आणि यादगिरीत १ वर्षाच्या कोवळ्या, निष्पाप बालिकांवरील अत्याचारांबाबत ते भावुक होऊन बोलले आहेत. त्या राक्षसी आरोपीनी अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पीडितेला पुन्हा त्रास दिला आहे. एक आई म्हणून मलाही असुरक्षित वाटते. मुलगी ही कुटुंबाचे डोळे, शिकलेली मुलगी संपूर्ण गावाला आदर्श हे केवळ लिहिण्या-वाचण्यापुरती मर्यादित आहे का असा सवाल त्यांनी केला.
त्यानंतर काँग्रेसच्याच आ. सौम्या रेड्डी म्हणाल्या, महिला अत्याचाराचे राजकारण केले जाऊ नये. अशा घटना गांभीर्याने घ्याव्यात. पुरुषप्रधान समाजात आम्ही इतक्याच आमदार आहोत. त्या युवतीने, महिलेने कोणते कपडे घातले होते? ती तेथे का गेली होती? कोणासोबत गेली होती? असे प्रश्न केले जातात. विद्यार्थिनींनी सायंकाळी ६ नंतर बाहेर पडू नये असे विधान करणाऱ्या म्हैसूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निलंबित का केले नाही? असा सवाल त्यांनी सरकारला केला. या देशात आम्ही ५०% आहोत. देशात महिलांना लक्ष्मी, सरस्वती म्हणून पुजले जाते. पण आम्हाला पूजा नको, आम्हाला सन्मान पाहिजे, सुरक्षितता पाहिजे असे आ. सौम्य रेड्डी यांनी सांगितले.
यानंतर बोलताना खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, आम्ही सगळे बलात्काराबद्दल बोलतो आहोत. आमच्या सरकारवेळी कमी होते, तुमच्या सरकारमध्ये कमी होते असे बोलणे लाजिरवाणे आहे. आम्ही येथे यावर चर्चा करत असलो तरी बाहेर अत्याचार घडत आहेत. या घटना थांबवणे का शक्य होत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सहावीपासून लैंगिक शिक्षण दिले पाहिजे. मुलांना लैंगिक शिक्षण देण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी आ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना भाजप आ. पूर्णिमा म्हणाल्या, महिलेकडे बघण्याचा प्रत्येक पुरुषाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. महिला अत्याचाराच्या घटनांचा तपास वेगाने झाला पाहिजे. आरोपीना १-२ वर्षांत कथित शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले.
त्यानंतर बोलताना बेळ्गावग्रामीणच्या काँग्रेस आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, २०१८ ते ३१ जुलै २०२१ या काळात राज्यात महिला अत्याचाराची १३०० प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यात केवळ ६ आरोपीना शिक्षा झाली आहे तर ५० जण निर्दोष सुटले आहेत. उर्वरित प्रकरणे विचाराधीन आहेत. अशी प्रकरणे रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महिला सहायवाणी केंद्रांची स्थापना केली पाहिजे अशी मागणी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.
एकंदर आज विधानसभेत महिला अत्याचाराच्या मुद्द्यांवरून महिला सदस्य भावुक झाल्याचे दिसून आले.


Recent Comments