Chikkodi

चिक्कोडी जिल्हा निर्मितीला प्राधान्य; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार – खासदार प्रियांका जारकिहोळी

Share

चिक्कोडी स्वतंत्र जिल्हा निर्मितीला आपले पहिले प्राधान्य असून, आगामी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन यासंदर्भात विशेष मागणी करणार असल्याचे खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी सांगितले. चिक्कोडी येथील खासदार कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदारसंघातील विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर भूमिका मांडली.

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी चिक्कोडी येथे लष्करी कॅन्टीन मंजूर व्हावे, यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच माता-बाल रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता दूर करून रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मतदारसंघातील विविध भागांतील पाणीटंचाई दूर करण्याला प्राधान्य देण्यात आले असून, तातडीने बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून संसदेत महत्त्वाची विधेयके मांडली जात असल्याने पक्षाने व्हिप जारी केला असून, उद्या संसदेच्या कामकाजाला अनिवार्यपणे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रियांका जारकिहोळी यांनी सांगितले. यावेळी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीका करताना विरोधकांमध्ये फूट पाडणे आणि त्यांच्यात भीती निर्माण करणे, अशी रणनीती केंद्र सरकारकडून राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही लोकशाहीविरोधी कृती असल्याचेही त्यांनी म्हटले.

Tags: