Belagavi

ऐतिहासिक जक्केरी होंड कचराकुंडीच्या विळख्यात; स्वच्छतेसाठी गवळी समाज सरसावला

Share

बेळगावातील ऐतिहासिक जक्केरी होंडच्या अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गवळी समाजबांधवांनी स्वतःच स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. तलावात साचलेला कचरा हटवून पाणी सोडण्याची मागणी करत, त्यासाठी अडथळा ठरणारे काँक्रीट स्वतः हटविण्याचा इशाराही समाजाने दिला आहे.

इंद्रप्रस्थ नगरमधील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या जक्केरी होंड अर्थात रामतीर्थ तलावाची योग्य देखभाल होत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. नागरिकांकडून कचरा आणि पूजेचे निर्माल्य तलावात टाकले जात असल्याने तलावाचे स्वरूप कचराकुंडीसारखे झाले आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही न झाल्याने गवळी समाजबांधवांनी एकत्र येत स्वच्छतेचे काम सुरू केले.

तलावाची स्वच्छता करून त्यात पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले; मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कार्यवाही केली नसल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांनी केला. प्रशासनाचे दुर्लक्ष असेच सुरू राहिल्यास पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी टाकलेले काँक्रीट स्वतः हटवून तलावात पाणी सोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने याची दखल घेऊन जक्केरी होंडच्या संवर्धनासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

Tags: