बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जंगली हत्तींचा उपद्रव वाढला असून, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊस आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदारांच्या दुर्लक्षाबद्दल स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, शनिवारपर्यंत ऊसतोड न केल्यास साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खानापूर तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायत हद्दीतील कांजळे गावात गेल्या दोन दिवसांपासून नऊ जंगली हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. या हत्तींच्या कळपाने शेतकरी रावजी मष्णू पाटील यांच्या शेतातील सुमारे ५० टन ऊस पिकाचे, तसेच शेतकरी मष्णू गावडा यांनी कापून ठेवलेल्या भात पिकाचे पूर्णपणे नुकसान केले आहे. नेर्सा भागातून आलेल्या हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी आमदार विठ्ठल हळगेकर यांनी कांजळे परिसरातील ऊस पिकाची प्रथम तोडणी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हत्तींनी अर्ध्याहून अधिक ऊस खाऊन आणि तुडवून नुकसान केले असतानाही आमदारांनी या भागाकडे पाठ फिरवल्याचा आरोप निलावडे ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केला आहे.
येत्या शनिवारपर्यंत लैला साखर कारखान्याने ऊसतोडणी पथके पाठवून ऊसतोड सुरू करावी. अन्यथा कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments