संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये विद्यार्थ्यांना बालपणापासूनच समजावीत, यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या अभ्यासक्रमात संविधानाचे धडे समाविष्ट करण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली.

संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. संविधान हा केवळ ग्रंथ नसून प्रत्येक भारतीयाचे हक्क, सन्मान, स्वातंत्र्य आणि समानतेचे संरक्षण करणारे कवच आहे. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान निर्मितीची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक नागरिकाला न्याय, हक्क आणि समानतेची संधी देणाऱ्या संविधान निर्मात्यांचे योगदान देशाने कायम स्मरणात ठेवावे, असे शिवकुमार यांनी सांगितले.


माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरक्षण रद्द केल्यास देशात रक्तपात होऊ शकतो, याची भाजपला जाणीव असल्याचे म्हटले. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी दुसरा स्वातंत्र्यलढा उभारण्याची गरज असून, त्यासाठी कोणत्याही संघर्षाला तयार राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. संविधानातील अनेक उद्दिष्टे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. संविधानाला विरोध करणाऱ्यांना त्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही सिद्धरामय्या यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी यापूर्वी संविधान दिनाचे कार्यक्रम प्रामुख्याने बेंगळुरूपुरते मर्यादित होते. आता म्हैसूरमध्येही मोठ्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समाधान असल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संविधान दिनाचे कार्यक्रम आयोजित करून संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवावे. संविधानाची मूल्ये केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता ती लोकांच्या जीवनात रुजली पाहिजेत, असे आवाहन सतीश जारकिहोळी यांनी केले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य सिद्धरामय्या, राज्यसभा सदस्य रणदीपसिंग सुरजेवाला, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, मंत्री के. एच. मुनियप्पा, डॉ. यतींद्र सिद्धरामय्या, पी. एम. नरेंद्रस्वामी, सतीश जारकिहोळी, रिझवान अर्शद, टी. रघुमूर्ती, के. एम. शिवलिंगेगौडा, एन. चलुवरायस्वामी, के. एस. बसवंतप्पा, यू. टी. खादर, सी. पुट्टरंगशेट्टी यांच्यासह आमदार आणि विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.


Recent Comments