संत बसवेश्वरांचे व्यक्तिमत्त्व आणि शरणांच्या वचनांचा अवमान केल्याचा आरोप करत लेखक रवी हंज आणि खासगी वाहिनीच्या संपादकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जागतिक लिंगायत महासभेने केली आहे.
चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा घटकाचे अध्यक्ष चंद्रशेखर गुडसी यांनी ही मागणी केली. चिक्कोडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘बसव मंटप’ या पुस्तकाचे लेखक रवी हंज यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संत बसवेश्वरांविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचा, तसेच लिंगायत समाजाचा ‘लिंगाहत’ असा अवमानकारक उल्लेख केल्याचा आरोप त्यांनी केला.

शरणांच्या वचनांचा विपर्यास करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही महासभेने केला. याप्रकरणी महासभेच्या चिक्कोडी घटकाच्या पदाधिकाऱ्यांनी चिक्कोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गुडसी यांनी केली.
पत्रकार परिषदेला महासभेचे सचिव बसवराज मंटूरे, पुंडलीक चौगला, महालिंगप्पा मनगोळी, बाळाप्पा तेली, बसवप्रभू अरबावी, विजयकुमार गुडसी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments