Belagavi

बेळगाव हिवाळी अधिवेशनासाठी सुवर्ण विधानसौध सज्ज; विधानसभा अध्यक्षांकडून तयारीची पाहणी

Share

बेळगाव येथे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी सुवर्ण विधानसौधाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दोन्ही सभागृहांचे प्रमुख बेळगावात दाखल झाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अधिवेशनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी दोन्ही सभागृहांची पाहणी केली. अध्यक्षांचे आसन, मंत्री व आमदारांची आसनव्यवस्था, अधिकारी कक्ष, माध्यम गॅलरी आणि नागरिकांसाठीच्या प्रेक्षक गॅलरीची त्यांनी तपासणी केली. तसेच तांत्रिक व्यवस्थांचाही आढावा घेतला.

सभागृहातील ध्वनिवर्धक व्यवस्था, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दोन्ही प्रमुखांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Tags: