राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) कर्नाटकातील विविध निगम, मंडळे आणि अन्य महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील १८ नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, बी. शिवण्णा यांची कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी, के. षडक्षरी यांची कर्नाटक राज्य खनिज निगमच्या अध्यक्षपदी, पी. एम. अशोक यांची कर्नाटक बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी, तर ए. आर. कृष्णमूर्ती यांची बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हंपनगौडा बादरली यांच्याकडे कर्नाटक राज्य गोदाम महामंडळ, डी. जी. शांतनगौडा यांच्याकडे बंगळुरू घनकचरा व्यवस्थापन महामंडळ, जी. एच. श्रीनिवास यांच्याकडे कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ, महांतेश कौजलगी यांच्याकडे कर्नाटक रस्ते विकास महामंडळ, तर एस. एन. सुब्बारेड्डी यांच्याकडे म्हैसूर सेल्स इंटरनॅशनल लिमिटेडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बेळूर गोपालकृष्ण यांची विधानसभेतील सरकारचे मुख्य प्रतोद म्हणून, तर तन्वीर सेठ यांची मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एन. एच. कोनरेड्डी यांची कर्नाटक कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी, बसनगौडा दद्दल यांची कल्याण कर्नाटक प्रदेश विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आणि मंजुनाथ भंडारी यांची विधान परिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अल्लमप्रभू पाटील यांच्याकडे कर्नाटक लघुउद्योग विकास महामंडळ, श्याम नाटेकर यांच्याकडे कर्नाटक मसाला विकास मंडळ, एच. सी. ललित राघव यांच्याकडे कर्नाटक विद्युत कारखाना महामंडळ, तर सुभाष राठोड यांच्याकडे कर्नाटक तांडा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


Recent Comments