hubali

हुबळीच्या सेटलमेंट परिसरात टोळीयुद्धाची भीती; शस्त्रांसह कुटुंबावर हल्ल्याचा कट असल्याचा आरोप

Share

हुबळीच्या सेटलमेंट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. बसवराज जाधव यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा काही जण कट रचत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

बेंडिगेरी पोलीस ठाण्यासमोर झालेल्या वादानंतर श्याम जाधव, रवी जाधव, गणेश जाधव यांच्यासह काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाचा राग मनात धरून काही जण गट तयार करत शस्त्रांसह बसवराज जाधव यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आहे.

बसवराज जाधव यांच्या घरी विवाह सोहळा होणार असून, हा सोहळा उधळण्याच्या उद्देशाने काही जण अशा कारवाया करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हातात घातक शस्त्रे घेऊन हल्ल्याची तयारी सुरू असल्याचा दावा बसवराज जाधव यांनी केला आहे.

शहरातील निवासी भागात मारामारी आणि घातक शस्त्रे घेऊन फिरण्याच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी होत आहे.

सेटलमेंट परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपांची चौकशी करावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: