गोहत्या आणि धर्मांतरबंदी कायदे मागे घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी हुबळीत दिला. कायदे मागे घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गायींसह धरणे धरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हुबळीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी काँग्रेस सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. राज्याच्या सीमाभागात दररोज सुमारे दहा गायींची हत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदा मागे घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात हे दोन्ही कायदे लागू करण्यात आले होते. तरीही गोहत्या रोखण्यात यश आले नाही. राज्य सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदा मागे घेतल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल. सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण आणि पोलिसांमधील भ्रष्ट व्यवस्था याला जबाबदार असल्याचा आरोप मुतालिक यांनी केला.
गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ८०० कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३८ जणांवर मुस्लिम आणि गोहत्येत सहभागी असलेल्या व्यक्तींनी हल्ले केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, कोणतीही परवानगी न घेता राज्यात पाच हजार बेकायदा कत्तलखाने सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
धर्मांतरबंदी कायदा मागे घेण्यासाठी अलीकडेच मुस्लिम आणि ख्रिश्चन संघटनांनी आंदोलन करून सरकारवर दबाव आणला. त्यामुळे राज्य सरकार हा कायदा मागे घेत असल्याचा आरोप मुतालिक यांनी केला.
यावेळी श्रीराम सेनेचे पदाधिकारी मंजुनाथ कातकर, बस्सू गौडर आणि बस्सू दुर्गद उपस्थित होते.


Recent Comments