शासनाच्या विविध योजना आणि सुविधा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासह नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्याच्या उद्देशाने राज्यभर ‘प्रजासेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजू कागे यांनी केले.

शनिवारी उगार खुर्द येथील श्रद्धा मंगल कार्यालयात कागवाड तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित प्रजासेवा अभियानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासन स्वतः जनतेच्या दारात येऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या गावातील आणि शहरातील समस्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली.
कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादिमनी यांनी राज्य सरकारच्या या विशेष अभियानाचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. नागरिकांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन्ना वाली यांनी राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या भूमी गॅरंटी योजनेची माहिती दिली. तसेच महात्मा गांधी ग्रामपंचायत क्षेत्रातील जमिनींवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मालमत्ता हक्काची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या विशेष योजनेविषयी सांगितले. पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत उगार शहरातील नागरिक आणि युवकांनी विविध समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. अमृत-२ योजनेअंतर्गत रस्ते खोदून खड्डे तसेच ठेवण्यात आले असून ते बुजवण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नगरपरिषदेची अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत आमदार राजू कागे यांनी काही समस्यांचे जागेवरच निराकरण केले. उर्वरित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याची सूचना त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महांतेश कोल्लापूर यांना केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेच्या अध्यक्षा फातिमा नदाफ यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. उपाध्यक्ष सतीश जगताप, नगरसेवक, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी संजीवकुमार सदलगे, भूमापन विभागाचे अधिकारी चेतनकुमार, ए. जे. शेख, पीएसआय राघवेंद्र खोत, प्रशांत पोतदार, पी. डी. मदभावी, प्रवीण पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महांतेश कोल्लापूर यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गटशिक्षणाधिकारी पी. डी. मदभावी यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments