Uncategorized

यासीन हत्या प्रकरणात पोलिसांचा गोळीबार, मुख्य आरोपी जखमी

Share

विजापूर येथे भरदिवसा गोळ्या झाडून यासीन जूबेर याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात मुख्य आरोपी जखमी झाला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

५ नोव्हेंबर रोजी विजापूर शहरातील मुंडेवाडी रुग्णालयासमोर यासीन ठक्के ऊर्फ यासीन जूबेर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पत्नीला रुग्णालयात घेऊन आलेल्या यासीनवर तिच्यासमोरच गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यासीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

डीजे लावण्याच्या कारणावरून सुरू झालेला जुना वाद आणि गावातील वर्चस्वाची स्पर्धा या हत्येमागील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यासीन आणि समीर मुल्ला हे ठक्के गावातील रहिवासी होते. यापूर्वी झालेल्या वादातून यासीनने समीर आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून समीर यासीनचा बदला घेण्याच्या प्रयत्नात होता. याच वैमनस्यातून त्याने यासीनची हत्या केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथके स्थापन केली होती. तपासादरम्यान मुख्य आरोपी समीर मुल्ला हा अतालट्टी गावाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर समीरने देशी पिस्तुल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात समीरच्या पायाला गोळी लागली. या कारवाईत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी समीर मुल्ला, रशीद, इर्शाद आणि खादीर या चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले देशी पिस्तुल अवघ्या तीन दिवसांपूर्वी आणल्याचा संशय आहे. जखमी समीरला विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

डीजेच्या कारणावरून सुरू झालेला वाद आणि गावातील वर्चस्वाची स्पर्धा यांतून यासीनची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील चौघांना अटक झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

विजयकुमार सारवाड इन न्यूज विजापूर

Tags: