ऊस उत्पादकांच्या तीव्र होत असलेल्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात विजयनगर येथे खासदार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
विजयनगर येथे बोलताना खासदार जगदीश शेट्टर यांनी, शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य असून केंद्र व राज्य सरकारने यावर गांभीर्याने चर्चा करावी, असे म्हटले आहे. आपण स्वतः शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, आपण साखर मंत्री व मुख्यमंत्री असताना एफआरपी दर आणि कायद्याची अंमलबजावणी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. राज्य सरकारला अधिकार नाही असे म्हणणे योग्य नसून कायद्याचे पुनरावलोकन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने एमएसपी निश्चित करून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि केंद्र-राज्य दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जावे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारच्या तिजोरीतूनही शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत आणि भरपाई दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत, सरकार चालवण्यात मंत्र्यांना रस आहे का असा सवाल त्यांनी केला. दुष्काळ आणि अनुदानाच्या मुद्द्यावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments