बेळगाव येथील वडगाव अष्टविनायक नगरात श्री गणेशाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. या भव्य आगमन सोहळ्यासाठी सुमारे २० ते २५ हजारांहून अधिक भाविक आणि तरुण उपस्थित होते.


ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पोलीस उपआयुक्त (डीसीपी) नारायण बरमणी यांच्यासह मान्यवरांनी आरती करून मिरवणुकीला प्रारंभ केला. या प्रसंगी महाराष्ट्राच्या धर्तीवर भव्य आतषबाजी करण्यात आली.


श्री राम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की, महाराष्ट्रापाठोपाठ बेळगावमध्येही गणेशोत्सवापूर्वी गणपतीचे भव्य आगमन घडवून आणले जात आहे. या उत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महामंडळाचे प्रमुख सागर पाटील आणि सुनील जाधव यांनी, गणेशोत्सव साजरा करताना भाविक, महिला व मुलांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन शांतता व सौहार्दाने सण साजरा करावा, असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी हजारो भाविक उपस्थित होते.



Recent Comments