वन संरक्षणासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या विभागातील शूर हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून सर्वांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अश्विनीकुमार सिंग यांनी केले.


बेळगाव येथील वन विभाग कार्यालय परिसरात राष्ट्रीय वन हुतात्मा स्मरण दिन अत्यंत गांभीर्याने पार पडला. राज्यातील वन आणि वन्यजीव संपत्तीचे रक्षण करताना प्राणार्पण केलेल्या वन विभागाच्या हुतात्म्यांना मान्यवर आणि अधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. बेळगाव वर्तुळाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


वन आणि वन्यजीव संपत्तीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्याग स्मरणीय असून, १९६६ ते २०२६ या काळात राज्यात एकूण ६५ वन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना प्राण गमावले आहेत. वन्यजीवांचा संघर्ष आणि वन संरक्षणादरम्यान शंकर मूडलगी, गुरुलिंगप्पा हिरप्पा हमपय्या, नझीर बसरीकट्टी आणि एम. व्ही. रंगनगौडा यांच्यासह अनेक शूर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन मोलाचे योगदान दिल्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अश्विनीकुमार सिंग यांनी सांगितले.

१८ व्या शतकात झाडांची कत्तल रोखण्यासाठी एका महिलेने दिलेला लढा आणि केलेले आत्मसमर्पण अत्यंत स्मरणीय असून ते वन व वन्यजीव संरक्षणासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी केले. वन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि देश रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वन हुतात्म्यांना सन्मान देऊन त्यांच्या कुटुंबांना आवश्यक मदत पुरवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. आणि उत्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून हुतात्म्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


Recent Comments