बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वार्टर्स परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मार्केट पोलीस ठाण्याच्या पाठीमागील सार्वजनिक बांधकाम विभाग क्वार्टर्स परिसरात स्वच्छता न राखल्याने कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर शौचास बसणे आणि मद्यपींकडून होणाऱ्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक रहिवाशांनी परिसरातील समस्यांविषयी तक्रारींचा पाढा वाचला आहे.

परिसरात वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे घरांमध्ये साप आणि विंचू शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. जवळच असलेल्या उर्दू शाळेतील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच सर्पमित्रांनी या परिसरातून साप पकडल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. तसेच दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते अशी व्यथा येथील रहिवाशांनी मांडली.

या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन या परिसराची स्वच्छता करावी आणि मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Recent Comments