Athani

सीसीबी निरीक्षक अरुण साळुंखे यांचे पार्थिव जन्मगावी दाखल

Share

उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बंगळुरू सीसीबीचे निरीक्षक अरुण साळुंखे यांचे पार्थिव आज अथणी तालुक्यातील अरटाळ या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आले असून अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती.

चारधाम यात्रेदरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत अरुण साळुंखे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर गावातच अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.

मुलाच्या निधनाने वडील मनोहर साळुंखे यांना शोक अनावर झाला. चांगल्या माणसांचे देव रक्षण करतो, हा विश्वास आता खोटा ठरल्याची भावना त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून व्यक्त केली. पाच मित्र श्रद्धेने चारधाम यात्रेला गेले होते; मात्र देवाने आपल्या मुलाला केदारनाथ आणि बद्रीनाथ येथेच आपल्याजवळ बोलावून घेतल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. सामान्य शिपायापासून सर्वांशी आपुलकीने वागणारा मुलगा गमावल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.

केएएस अधिकारी अशोक मिर्जी यांनीही मित्र अरुण साळुंखे यांच्या आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले. शालेय जीवनापासून दोघांची मैत्री होती. आपण पोलीस कॉन्स्टेबल असताना अरुण हे पीएसआय पदावर होते. त्यांनी आपल्याला केएएस परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिल्याचे सांगत आठवणींना उजाळा दिला.

बेळगावमध्ये एकत्रित केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, दिल्लीतील प्रशिक्षणाची माहिती आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचा उल्लेख करताना त्यांनी अरुण यांच्या पाठिंब्यामुळेच आपल्या यशाचा मार्ग सुकर झाल्याची कृतज्ञता व्यक्त केली.

पार्थिव दाखल होताच कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Tags: