मास्तमर्डी येथे रस्ते विकासकामाचा शुभारंभ विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

ग्रामीण भागातील दळणवळणासाठी चांगले रस्ते महत्त्वाचे आहेत. रस्त्यामुळे ग्रामस्थांची दैनंदिन वाहतूक सुलभ होण्याबरोबरच शेती, व्यापार, विद्यार्थ्यांची ये-जा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांनाही मदत होणार आहे.


यावेळी बोलताना चन्नराज हट्टिहोळी म्हणाले, ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावाला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे विकासाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रस्ते, पिण्याचे पाणी आणि गटारांसारख्या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना प्राधान्य दिले जात आहे. संबंधितांनी कामाचा दर्जा राखून ते निर्धारित वेळेत पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.

गावांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत स्थानिक नेते आणि ग्रामस्थांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने विकासकामे हाती घेतली जात आहेत. मास्तमर्डीतील रस्त्यामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अरळीकट्टीचे शिवमूर्ती स्वामीजी, प्रकाश पाटील, यल्लाप्पा तोरळी, महांतेश पाटील, श्रीशैलगौडा पाटील, सुरेश पाटील, विक्रम जंगळी, महानंदा मरकुट्टी, बाळव्वा जंगळी, बाळू कुरंगी, राघवेंद्र माविनकट्टी, संदीप पारिशवाड, मंजुनाथ कोलकार आणि बसवराज कोलकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments