ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला चिक्कोडी तालुका बंद यशस्वी झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात सकाळपासून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रासायनिक खते, मजुरी, वाहतूक आणि शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही सरकार आणि साखर कारखानदार शेतकऱ्यांना योग्य दर देत नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळेपर्यंत आणि उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी चिक्कोडी-मिरज मुख्य मार्ग रोखून धरना आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. सीमाभागातील महत्त्वाचा संपर्कमार्ग असलेल्या या रस्त्यावर शेकडो वाहने अडकून पडल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
तालुक्यातील व्यापारी संकुले, हॉटेल्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रवासी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कागवाड, मिरज तसेच परिसरातील मार्गांवरील बससेवाही बंद ठेवण्यात आली होती.
आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चिक्कोडी तालुका पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


Recent Comments