बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कर्नाटक सरकारच्या कन्नड व संस्कृती विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कित्तूर उत्सव २०२६’ च्या पार्श्वभूमीवर आज बंगळुरू येथे भव्य ‘विजयज्योती’ यात्रेचा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अभूतपूर्व लढा देऊन विजय मिळवणाऱ्या, कन्नड भूमीच्या पराक्रमी वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या असीम शौर्य, साहस आणि देशभक्तीचा संदेश राज्यभरात पोहोचवण्यासाठी या विशेष विजयज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

बंगळुरू येथील विधानसौध आवारात आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, विविध मठांचे पूज्य स्वामीजी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात प्रास्ताविक करताना कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर उत्सवाची सविस्तर पार्श्वभूमी व रूपरेषा मांडली. राणी चन्नम्मा यांनी दाखवलेले धैर्य आणि त्याग हे प्रत्येक भारतीयासाठी स्फूर्तीदायक आहे. ही विजयज्योत कर्नाटकातील जनतेच्या स्वाभिमान, शौर्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून राज्यभर प्रज्वलित राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यानंतर विधानसौध समोर मान्यवरांच्या हस्ते ‘विजयज्योती’चे पूजन करून यात्रेला अधिकृतपणे रवाना करण्यात आले. कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या पारंपरिक लोककला पथकांच्या ढोल-ताशांच्या गजरात आणि सांस्कृतिक सादरीकरणात ही मिरवणूक अत्यंत दिमाखात निघाली.
ही ‘विजयज्योती’ यात्रा राज्यभरातील विविध गावे, तालुके आणि शहरांमधून मार्गक्रमण करत कित्तूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकेल. ठिकठिकाणी या ज्योतीचे आणि चन्नम्मा यांच्या स्मृतींचे भव्य स्वागत केले जाणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी मुख्य उत्सव सुरू होण्यापूर्वी ही विजयज्योत कित्तूर येथील मुख्य उत्सव मंचावर स्थापित केली जाईल.
दरम्यान, कित्तूर उत्सवाचा मुख्य सोहळा २३, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक कित्तूर येथे अतिशय भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असून, यामध्ये विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.


Recent Comments