State

…आपल्यालाही ट्रॅप करण्याचा प्रयत्न.. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

Share

मुख्यमंत्री झाल्यानंतर मलाच ट्रॅप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता, असा अत्यंत स्फोटक आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. या कटामागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांना आर्थिक मदत कोण करत आहे, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना स्टिंग ऑपरेशनबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. चर्चेच्या बहाण्याने आलेल्या लोकांनी काय-काय केले, याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. एका जबाबदार पदावर बसलो असल्याने हवेत वक्तव्य करणार नाही आणि वेळ पडल्यास फोटोही जाहीर करू. यामुळेच आपल्या सहकाऱ्यांना सावध राहण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, एसआयआर प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या फॉर्म ७ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबतचे सर्व पुरावे दिल्लीत आणले असून हायकमांडच्या निदर्शनास ते आणून दिले जातील. भाजप नेते चौकशीला विरोध करत असून नुकतीच राज्यपालांची भेट घेतलेल्या काही नेत्यांचाच या घोटाळ्यात सहभाग आहे. आपले नाव उघडकीस येईल या भीतीनेच भाजप चौकशी टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेत्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई अमानुष असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या तीन दिवसांपासून जीएसटी बैठक सुरू असून आज या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व माहिती तिथे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या स्टिंग ऑपरेशनविषयक इशाऱ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बागलकोट येथे बोलताना कडाडून टीका केली. रमेश जारकीहोळी प्रकरणाचा संदर्भ देत, राज्यात स्टिंग ऑपरेशन नक्की कोण करते हे कर्नाटकातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असा टोला विजयेंद्र यांनी लगावला.

Tags: